कै.त्र्यंबक आसरडोहकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विद्या गावंडे यांना जाहीर

आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण देशमुख यांची माहिती

अंबाजोगाई : कै.त्र्यंबक आसरडोहकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन – 2019 साठी पत्रकार विद्या गावंडे (औरंगाबाद) यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहीती त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पत्रकार किरण देशमुख यांनी दिली आहे.

कै. त्र्यंबक आसरडोहकर हे पहील्या पिढीतील ग्रामीण साहित्यिक होते. ते एक अभ्यासू पत्रकार, लेखक व ग्रामीण कथाकार म्हणून ही ओळखले जातात. त्यांची स्मृती व कार्य नव्या पिढीसमोर कायम रहावे या विधायक हेतूने हा पुरस्कार अंबाजोगाई येथील आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवर पत्रकार व पत्रकारिता क्षेत्रातील युवा प्रतिभांना सन 2010 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यापुर्वी हा पुरस्कार न्युज 18 इंडिया वाहिनीचे स्थानिक संपादक संदिप सोनवलकर (मुंबई), कलीम अजीम (पुणे), दत्तात्रय देशमुख (बीड), श्रावणकुमार जाधव (केज), गोविंद शेळके (घाटनांदूर), अभिजीत गाठाळ (अंबाजोगाई), सय्यद दाऊद (आडस), अतुल कुलकर्णी (बीड) आदी मान्यवर संपादक व पत्रकारांना प्रदान करण्यात आलेला आहे. कै.त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानने प्रसिद्धीपत्रकाद्वारे यावर्षीचा नववा पुरस्कार पत्रकार विद्या गावंडे (औरंगाबाद) यांना देणार असल्याचे घोषित केले आहे.

पत्रकार विद्या गावंडे हे नांव ‘दैनिक दिव्यमराठी’या आग्रगण्य वर्तमानपत्रातून सातत्याने वाचले गेलेले आहे. विद्या गावंडे या ‘दैनिक दिव्य मराठी’ वर्तमानपत्राच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात सध्या वार्ताहर (रिपोर्टर) म्हणून कार्यरत आहेत. प्रिंट मिडियातून सातत्याने ग्रामिण विकासाच्या प्रश्‍नांना त्यांनी वाचा फोडली आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विधायक व सुसंस्कृत पत्रकारितेचा वसा व वारसा त्या जोपासत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात प्रिंट मिडियातील त्यांचा अनुभव हा मोठा आहे. विकासाभिमुख आणि विधायक पत्रकारितेसाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत. तसेच शिक्षण, जिल्हा परिषद, महिला सबलीकरण, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींवर लक्ष वेधून घेणारी विधायक व विकासात्मक पत्रकारिता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. तरूण पिढीतील उत्तम राजकिय विश्‍लेषक म्हणूनही पत्रकारीता क्षेत्रात त्यांची स्वतंत्र ओळख आहे.

यापूर्वीही विद्या गावंडे यांना विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून निवड समितीने त्यांची 2019 सालच्या त्र्यंबक आसरडोहकर या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. ज्येष्ठ पञकार राही भिडे (मुंबई) यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्या गावंडे यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, फेटा, शाल, रोख रक्कम व पुष्पहार असे आहे. अशी माहीती त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पत्रकार किरण देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.