टीम AM : राज्यातील सुमारे एक कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केल्यानंतर महायुती सरकारने आपला मोर्चा आता शेतकऱ्यांकडे वळविला आहे.
त्यानुसार नमो शेतकरी ‘महासन्मान’ योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी 20 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे 2041 कोटी 25 लाख रुपये जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जून 2023 पासून राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या बरोबरीने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून राज्य सरकारमार्फत आतापर्यंत तीन हप्त्यात पाच हजार 512 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एक कोटी 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी 2041 कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.