बीड जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा : जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

परळीची जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी : राज्य प्रभारी व प्रदेशाध्यक्षांकडे कार्यकर्त्यांची मागणी

टीम AM : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लातूर या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनेची सध्याची स्थिती, बूथ बांधणी, बीएलए, फ्रंटल, सेलचा आढावा घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. 

यावेळी अतिशय प्रभावी आणि सकारात्मक पध्दतीने बीड जिल्ह्याची बाजू मांडत जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी बीड जिल्ह्यात कॉंग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत बीड, गेवराई, केज आणि परळी यापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला. 

यावेळी प्रामुख्याने परळी मतदारसंघ काँग्रेसला सोडावा व तेथून काँग्रेस पक्षानेच निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्याकडे बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली.

यावेळी महाविकास आघाडीच्या बीड जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कॉंग्रेसचे जिल्हा राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, जेष्ठ नेते ॲड. अनंतराव जगतकर, नवनाथ बापू थोटे, जेष्ठ नेते प्रवीणकुमार शेप, महावीर मस्के, परळी शहराध्यक्ष बहादूर भाई, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, परळी तालुकाध्यक्ष प्रा. अनिल जाधव, माजलगाव तालुकाध्यक्ष नारायणराव होके, केज तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेदरे, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, परळी विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, ॲड. प्रकाश मुंडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी पांडुळे, जिल्हाध्यक्ष विष्णू मस्के, ईश्वर सोनवणे, दत्ताभाऊ गव्हाणे, शिवाजीराव देशमुख, प्रकाशराव देशमुख यांनी व्यक्त केला.