केज मतदारसंघात बौद्ध उमेदवाराला संधी मिळावी : भाई दिपक केदार
अंबाजोगाईत पत्रकार परिषदेचे आयोजन
टीम AM : महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला मतदारसंघ म्हणून केज मतदारसंघाची ओळख निर्माण करण्याचे काम दुर्दैवाने ज्याच्या ज्याच्या हातात सत्ता आली त्या राजकीय मंडळींनी केले आहे. युवकांना रोजगार नाही, ‘एमआयडीसी’ नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मुलभूत प्रश्न गंभीर आहेत, जातीयता तीव्र आहे. केज मतदारसंघातील अनेक घटनांना वाचा फोडण्याचे काम आम्ही केले आहे. त्याच्यामुळे प्रस्थापित उमेदवारांकडून जनता निराश झाली आहे. हा मतदारसंघ पुढे राखीव राहिल का ? हे निश्चित नाही. मतदारसंघ जोपर्यंत राखीव होता, तो पर्यंत बौद्ध उमेदवाराला संधी मिळाली नाही. त्यामुळे ही शेवटची संधी केज मतदारसंघात बौद्ध उमेदवाराला मिळावी, हा प्रामुख्याने दावा आम्ही करत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ताकदीने लढणार असल्याचे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
अंबाजोगाईत भाई दिपक केदार यांनी आज दिनांक 2 ऑगस्टला शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला संघटनेचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना भाई केदार म्हणाले की, केज मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष [ शरद पवार गट] शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सुरू ठेवली असून महाविकास आघाडीने आम्हाला प्रतिनिधित्व दिल्यास मी स्वतः निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. हा नवा चेहराच मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू शकतो, आलटूनपालटून जे मतदारसंघात सुरु आहे, ते निराशाजनक आहे. खा. बजरंग सोनवणेंच्या अंबाजोगाई येथील जाहीर सभेत मी जी भूमिका मांडली होती, ती भुमिका केज मतदारसंघातील गरीब मराठा, दलित, आदिवासी, मुस्लिम बांधवांना आवडलेली आहे आणि त्यांनीच या मतदारसंघात मी निवडणूक लढवावी, अशी मागणी केलेली आहे. त्यासाठी आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करून तयारीही सुरू केली असल्याचे भाई केदार यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी तरुणाच्या कुटुंबाला न्याय द्यावा
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी या गावातील तरुणाचे लातूर येथे निर्घृण हत्याकांड झालेले आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी अद्याप या कुटुंबाची भेट घेतली नाही आणि त्यांचे सांत्वन केले नाही. आपल्या मतदारसंघातील हे पिडीत कुटुंब असल्याने त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही भाई दिपक केदार यांनी पत्रकार परिषदेत केले.
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी जीवन गायकवाड तर मराठवाडा युवक अध्यक्षपदी अक्षय भुंबे यांची निवड
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी जीवन गायकवाड तर मराठवाडा युवक अध्यक्षपदी अक्षय भुंबे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी यावेळी केली. संघटनेचे काम वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. या दोघांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.