‘आरक्षण बचाव यात्रा’ : अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद
टीम AM : ओबीसी समाजाची आत्मघातकी वाटचाल सुरु आहे. आज आरक्षणाच्या बाबतीत जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात उभी टाकली आहे ती विदारक आहे. ‘ओबीसी’ आरक्षण वाचवायचं असेल तर संपूर्ण ओबीसी बांधवांनी एकत्र येत लढा दिला पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘ओबीसी’ चे 100 आमदार निवडून आले पाहिजेत आणि हे लक्ष ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असे मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची ‘आरक्षण बचाव यात्रा’ आज [दि. 30] अंबाजोगाईत दाखल झाली. या यात्रेचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. नंतर शहरातील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ओबीसी समाजाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी मानवतेची शिकवण दिली आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीने माणसामाणसामध्ये भेद निर्माण करण्याची शिकवण दिली आहे. हा एक मानसिक छळ असून याला प्रत्येक वेळेस आपण बळी पडतोय. त्यामुळे आता आपल्याला सतर्कता आणि जागरुक राहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुन्हा लढण्याची वेळ आली आहे. आरक्षण देताना आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि ज्यांना कुणाला आरक्षण द्यायचे आहे, त्यांचं ताट वेगळं असले पाहिजे. दोघांचं ताट एक असता कामा नये, ही आमची भूमिका आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात 55 लाख प्रमाणपत्र राज्य सरकारने वितरित केली आहेत. ही सर्व प्रमाणपत्र बोगस असून ती रद्द करण्यात यावीत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत तर ओबीसी समाज या आरक्षणाला विरोध करीत आहेत. यामुळे दोन्ही समाजात तट पडली आहे. शेवटी आरक्षण द्यायचे की नाही द्यायचे हा राजकीय विषय आहे. त्याला राजकीय पटलावरचं सोडविला पाहिजे. पण या मुद्याच काही जण राजकारण करीत सामाजिक रुप देण्याचं प्रयत्न करीत आहेत. या मुद्याला ओबीसी बांधवांनी सामाजिक रुप देऊ नये, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ओबीसी समाजाला राजकीय चेहरा नाही
चटका बसता तेंव्हाच लोक जागे होतात. अशी स्थिती आता ओबीसी समाजाची झाली आहे. ओबीसी समाजाचा राजकिय चेहरा अजून जन्माला आला नाही. जे आहेत, ते त्या – त्या समाजाचे चेहरे आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचवायचे असेल तर आता सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, ॲड. किशोर गिरवलकर, बिभीषण चाटे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोविंद मस्के यांनी मानले. सभेला मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांची उपस्थिती होती.
7 ऑगस्ट मंडल दिवस म्हणून साजरा करा
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी भारतात सामाजिक परिवर्तन करणारे मंडल कमिशन 7 ऑगस्टला ओबीसींसाठी लागू केले. म्हणून 7 ऑगस्ट हा मंडल दिवस साजरा करा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच येत्या 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे आरक्षण बचाव यात्रेचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
अंबाजोगाईत मोटारसायकल रॅली
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या सभेपुर्वी अंबाजोगाई शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील यशवंतराव चव्हाण चौकातून निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंडीबाजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आली आणि नंतर रॅलीचे सभेत रुपांतर झाले.