धक्कादायक : दिड महिन्यापासून शाळेत गणिताचा शिक्षक नाही : राडीतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात

गणिताचे शिक्षक द्या : राडीच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा

टीम AM : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत असताना अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दिड महिन्यापासून राडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत गणिताचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेले आहे. वेळोवेळी मागणी, निवेदने, पत्रव्यवहार करून देखील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने या विद्यार्थ्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. अखेर विद्यार्थ्यांचा आणि राडी गावातील ग्रामस्थांचा संयम तूटला आणि थेट त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी राडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवीत धडे गिरवू लागले. दरम्यान, शाळेतील विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. तब्बल तीन ते चार तास विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गणिताच्या शिक्षकासाठी तळ ठोकून होते. 

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात बसलेले राडी येथील शाळेतील विद्यार्थी…

कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

राडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवली असता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. विद्यार्थी आणि पालकांची मागणी तात्काळ बीड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येईल आणि तातडीने शाळेत गणिताचा शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन विद्यार्थी आणि पालकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदनही दिले. आश्वासनानंतर विद्यार्थी परत राडी गावातील शाळेकडे रवाना झाले.