बीड जिल्ह्यात दलितांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाही
टीम AM : बीड जिल्ह्यातील पालवण गावात दलितांना आजही स्मशानभूमी नाही. एका वृत्तसंस्थेने ही घटना निदर्शनास आणली. या पार्श्वभूमीवर ते आपल्याला अंत्यसंस्कारासाठी दोन फूट जागा देऊ शकत नाहीत. मग तुम्हाला असे खरेच वाटते का, की ते आपल्याला राजकीय सत्तेत वाटा देतील ? आपल्याला त्यांच्याकडून राजकीय सत्ता हिसकावून घ्यावी लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
खोलवर रुजलेल्या जातीय संघर्षाची आणि आयुष्यातील भेदभावाची ही रोजची कहाणी आहे. आपण जिवंत असतानाही आपल्याला प्रतिष्ठा देण्यात येत नाही. आपण मेल्यावरही आपल्याला प्रतिष्ठा देण्यात येत नसल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी, बीड जिल्हा समितीशी मी बोललो आहे. वंचित बहुजन आघाडी लवकरच हा विषय जिल्हा प्रशासनाकडे मांडणार असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.