‘अर्थसंकल्पातला 1 रुपया तरी पत्रकार हितासाठी ठेवा’: अभिनेते सयाजी शिंदेंसह प्रशांत दामले यांचं सरकारला साकडं

टीम AM : मनोरंजन विश्व असो किंवा जगात घडणारी कुठलीही छोटी – मोठी गोष्ट, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळ्याच बातम्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकार प्रचंड मेहनत घेत असतात. वेळे प्रसंगी भर पावसात, पुराच्या पाण्यात ते अगदी कडाक्याच्या थंडीत अन् रणरणत्या उन्हात देखील पत्रकार बंधू प्रत्येक घडामोडींना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत असतात. अगदी तुमच्या भागात घडलेली एखादी घटना असो, वा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेली एखादी मोठी घटना असो, ती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतात. मात्र, या पत्रकारांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एखादं हक्काचं असं कल्याणकारी मंडळ असायला हवं, अशी मागणी सध्या ‘मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया’ कडून म्हणजेच ‘माई’ कडून केली जात आहे. ‘माई’ च्या शीतल करदेकर यांनी ‘माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळा’ साठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभासाठी सर्वांनी सहभागी व्हा!, असं म्हणत त्यांनी सगळ्यांनाच आवाहन केलं आहे. त्यांच्या या उपोषणाला अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील पाठिंबा दिला आहे. मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेणाऱ्या सयाजी शिंदे यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, ‘प्रसार माध्यमात काम करणाऱ्या माध्यम कर्मींसाठी कल्याणकारी महामंडळ असायलाच हवे. मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ‘माई’ च्या शीतल करदेकर या यासाठी आमरण उपोषण करत आहेत. सरकारने त्याची गांभीर्याने दाखल घ्यायला हवी. या उपोषणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.’

या सोबतच त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्राचे दयावान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतिहास घडेल ! आमच्या या क्रांतीचे रक्षक व्हा ! दानशूर अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पातला १ ₹ पत्रकार हितासाठी काढून ठेवा ! आज माननीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. जय भवानी जय शिवराय !’ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा देत व्हिडीओ शेअर केला आहे.

महामंडळ असले की मदत होते : प्रशांत दामले

‘पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी कल्याणकारी महामंडळ असायला हवं, याबद्दल माझ्या मनात कुठलेही दुमत नाहीये. महामंडळ असले की मदत होते, मार्गदर्शन मिळतं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना विनंती आहे की, त्यांनी या गोष्टीला पाठिंबा द्यावा. शीतल करदेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला माझाही पाठिंबा आहे’, असे प्रशांत दामले म्हणाले आहेत.