टीम AM : आर. के. फिल्म्सचे प्रत्येक चित्रपट कायमच वैशिष्ट्यपूर्ण ठरले. अशाच ‘हीना’ [रिलीज 28 जून 1991] च्या प्रदर्शनास आज यशस्वी 32 वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे ‘हीना’ हा चित्रपट शोमन राज कपूर यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. त्यानुसार के. ए. अब्बास, वसंत साठे आणि जैनेद्र जैन यांनी पटकथा लिहिली.
हसिना मोईन यांचे संवाद होते. गीतकार आणि संगीतकार रविन्द्र जैन यांनी दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले आणि दुर्दैवाने राज कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर रणधीर कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
या चित्रपटात ऋषि कपूर, नवतारका झेबा बख्तियार आणि अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सईद जाफरी, फरिदा जलाल, रिमा लागू, किरणकुमार, दिलीप धवन, अरुण वर्मा, अरुण बक्षी, रझा मुराद, शफी इनामदार, मोहनिश बहेल आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन सुरेश सावंत यांचे आहे तर छायाचित्रण राघु कर्मकार यांचे आहे.
‘मै हू खुशरंग हीना’, ‘मै देर करता नही’, ‘चिठ्ठी नी’, ‘जानेवाले ओ जानेवाले’, ‘वश मल्ले, अनारदाना’ ही या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे मुंबईत आर. के. स्टुडिओत तसेच काश्मीर, कुलू, मनाली येथे शूटिंग झाले. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर मेट्रो हे होते.
शब्दांकन : संजीव वेलणकर