‘लापता लेडीज’ सारखी कलाकृती ठळकपणे अधोरेखित करण्याची गरज 

टीम AM : महिला सशक्तीकरणासारखा अवघड विषय सादर करताना प्रवचनाऐवजी प्रहसनाचा मार्ग निवडल्यामुळे ‘लापता लेडीज’ मधून दिग्दर्शिकेला प्रेक्षकांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा आहे तो फेमिनीझमच्या अतिरेकाशिवाय अगदी सहजपणे पोहोचतो. 

एका रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झालेल्या दोन नववधूंची ही गोष्ट मनोरंजक रीतीने सुरू होते. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेमधलं स्त्रीचं दुय्यम स्थान, भारतीय लग्नसंस्थेतली हुंडापद्धती व त्याआधारे होणारे महिलांचे मानसिक शोषण, स्त्रियांना आपल्या आवडीनिवडीवर घालावी लागणारी मूरड, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा झाकणे, चालताना पुढे नाही तर खाली बघणे, आपल्या नवऱ्याच्या नावाचा एकेरी उल्लेख न करणे या सर्व मागासवृत्तींचे चित्रण करताना सिनेमा कुठेही भाषणबाजी करत नाही. उलट अशा प्रसंगांच्या उपहासात्मक सादरीकरणामुळे हे सर्व मुद्दे मनाला भिडतात. लग्नानंतर एखाद्या स्त्रीची व्यक्तीगत ओळख हळूहळू पुसट होत जाते का ? या प्रश्नाचं साधर्म्य जेव्हा शीर्षकातल्या ‘लापता’ या शब्दापर्यंत येऊन ठेपतं तेव्हा शेवटाकडे हा सिनेमा भावनिक सुद्धा करून जातो.

सिनेमातले अधिकांश कलाकार नवखे असले तरी  त्यांच्याकडून उत्कृष्ट अभिनय करवून घेण्याचे श्रेय दिग्दर्शिका किरण राव हिला नक्कीच जाते. नीतांशी गोयल आणि प्रतिभा रांता या प्रमुख भूमिकेतल्या दोन्हीही नायिकांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्पर्श श्रीवास्तवचा [ज्याने नेटफ्लिक्सच्या ‘जमतारा’ मध्ये पदार्पण केले होते] नैसर्गिक अभिनय त्याची वेगळी दखल घेण्यास भाग पाडतो. मंजू ताईच्या भूमिकेत छाया कदमने भन्नाट काम केलंय तर सत्येंद्र सोनी, भास्कर झा, दुर्गेश कुमार यांच्या छोटया भूमिका देखील लक्षात राहण्यासारख्या आहेत. खरी कमाल केलीये ती रवी किशनने. त्याच्या पात्राच्या प्रवृत्तीचा शेवटपर्यंत अंदाज येऊ नये, या पद्धतीचे लिखाण झाल्यामुळे सबंध सिनेमाभर त्याचा प्रभाव जाणवतो. याचं खास श्रेय हे पात्र लिहिणाऱ्या दिव्यनिधी शर्मा यांस जातं.

स्नेहा देसाईची प्रवाही पटकथा आणि गमतीशीर संवाद सिनेमा कुठेही कंटाळवाणा होऊ देत नाहीत. किरण रावच्या बांधीव दिग्दर्शनामुळे सिनेमाचं प्रबोधनमूल्य अबाधित राहतंच पण व्यावसायिक मूल्य सुद्धा निसटत नाही. सिनेमात गाण्यांसाठी संयुक्तिक जागा नसल्या तरी पार्श्वसंगीत मात्र कथेस पूरक काम करतं.

सिनेमात दाखवलेला काळ हा पंचवीस वर्ष जुना आहे. आज महिलांची एकूण सामाजिक स्थिती पाहता त्या काळापेक्षा आज बरेचसे बदल झाले आहेत. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेत महिलांना दुय्यम समजल्या जाण्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर येण्यास पारंपारिक भारतीय व्यवस्थेस अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे मात्र नक्की. आणि म्हणूनच ‘लापता लेडीज’ सारखी कलाकृती ठळकपणे अधोरेखित करण्याची गरज आहे.

© डॉ. स्वप्नील देशमुख