‘एटीएम’ मधून पैसे काढताना सावधान : महिलेचे 31 हजार लंपास

टीम AM : अंबाजोगाई शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘एटीएम’ मधून पैसे काढत असताना तिथे येत, दिशाभूल करत चालाखीने कार्ड बदलून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेच्या कार्डचा वापर करून 31 हजार रुपये लंपास केले आहेत. हा प्रकार अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर परिसरातील ‘एसबीआय’ बँकेच्या ‘एटीएम’ मध्ये घडला.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, येथील वंदना आबासाहेब देशमुख [वय 52] रा. पाटोदा (म) ता. अंबाजोगाई या आपली मुलगी प्राजक्ता हिच्यासह पैसे काढण्यासाठी 23 फेब्रुवारीच्या रात्री प्रशांतनगर परिसरातील ‘एसबीआय’ बँकेच्या ‘एटीएम’ मध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांची मुलगी प्राजक्ता हिने ‘एटीएम’ मधून पैसे काढले. यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. माझे कार्ड चालत नाही, या कार्डद्वारे पैसे काढू, अशी बतावणी करून चालाखीने ‘एटीएम’ कार्डची अदलाबदल केली व निघून गेला. घरी आल्यावर दुसरेच कार्ड असल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आले. ही माहिती बँकेला सांगण्याअगोदरच ‘त्या’ अनोळख्या व्यक्तीने देशमुख यांच्या खात्यावरील 31 हजार रुपये काढून नेले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी वंदना देशमुख यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.