स्टुडिओमध्ये झाडू मारण्याचं केलं काम : एक रुपया घेतला पगार ! ‘अशी’ होती राज कपूर यांची सुरुवात…

टीम AM : बॉलिवूडचे ‘शो मॅन’ अर्थात राज कपूर यांचा आज (14 डिसेंबर) वाढदिवस आहे. आज जरी ते या जगात नसले, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीच्या प्रगतीत असलेलं योगदान कुणीच विसरू शकत नाही. ‘मेरा नाम जोकर’, ‘आवरा’ सारख्या चित्रपटांमधून राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही प्रेक्षक त्यांचे चित्रपट तितक्याच आवडीने बघतात, जितके त्या काळात पाहिले जायचे. आजही त्यांच्या चित्रपटांमधली गाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातात. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले.

राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव होते. पृथ्वीराज कपूर हे चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते असले, तरी राज कपूर यांना मात्र प्रचंड संघर्ष करावा लागला होता. राज कपूर यांनी वडिलांच्या स्टुडिओमधूनच कामाची सुरुवात केली होती. राज कपूर वडील पृथ्वीराज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये झाडू मारण्याचे काम करायचे. यासाठी त्यांना एक रुपया पगार मिळायचा. आपल्या मुलाला कुठलीही गोष्ट आयती मिळून तिची किंमत कमी होऊ नये, याची पुरेपूर काळजी पृथ्वीराज कपूर घ्यायचे. कार असताना देखील राज कपूर यांना सामान्य मुलांप्रमाणे चालत शाळेत जावं लागायचं.

राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी ‘इन्कलाब’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात ते बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये सहायक म्हणून काम करत होते. यानंतर ते केदार शर्मा यांच्यासोबत क्लॅपर बॉय म्हणून काम करू लागले होते. पुढे केदार शर्मा हे प्रसिद्ध दिग्दशर्क आणि निर्माते बनले. त्यांनीच राज कपूर यांचं टॅलेंट ओळखून त्यांना आपल्या ‘नीलकमल’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका ऑफर केली होती.

यानंतर राज कपूर यांनी देखील दिग्दर्शकीय पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यांनी इतक्या कमी वयातच ‘आरके स्टुडिओ’ ची स्थापना केली होती. या बॅनरखाली त्यांनी ‘बरसात’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर राज कपूर यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.