गांधीजींचा विचार डॉ. द्वारकादास लोहिया यांनी पुढे नेला – सुनंदा पवार

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

अंबाजोगाई : महात्मा गांधी यांनी पाहिलेले ग्रामीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. द्वारकादास लोहिया यांनी ही संकल्पना पुढे नेली. आयुष्याचे ५० वर्षे उपेक्षितांच्या उद्धारासाठी त्यांनी झोकून देवून काम केले. त्यांच्या या विचाराचा वारसा मानवलोक संस्थेने अखंडीतपणे जोपासावा असे आवाहन बारामती येथील कृषि विज्ञान केन्द्राच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. मानवलोकचे संस्थापक डॉ. लोहिया यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून अफार्म पुणेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख तर प्रमुख पाहुण्या म्हणून केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा, मानवलोकचे अध्यक्ष अशोक देशमुख, मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सुनंदा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये कै. अप्पासाहेब पवार आणि डॉ. लोहिया यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून राज्यासमोर आदर्श निर्माण केला. मानवलोक ही संस्था आजही या दोन्ही सामाजिक कर्तत्वाचा वारसा जोपासत आहेत. वातावरणातील बदलामुळे कृषि व्यवसाय व शेती धोक्यात आली आहे. हा वाढता धोका लक्षात घेवून शेतकऱ्‍यांनी आपल्या बियाणांमध्ये बदल केले पाहिजेत. कमी पाणी, कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर याचा अवलंब करून कमी खर्चात शेती करणे कसे शक्य होईल हे शास्त्रशुध्द पध्दतीने अंगीकारले पाहिजे. समाजात शेती व्यवसायासमोर अनेक धोके असले तरी शेती हाच व्यवसाय समाजाला तारणारा आहे. विषमुक्त शेती कशी करता येईल याकडे शेतकऱ्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. मराठवाडयात विवाहावर होणारा प्रचंड खर्च कसा टाळता येईल तसेच वाढता चंगळवाद, पर्यावरणाचा ऱ्‍हास अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. समाजात आजही कॅन्सर व प्रदुषण या प्रमुख समस्यांचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून प्लास्टीक बंदी व कचऱ्‍याचे निर्मुलन याकामी एकत्रित काम केले पाहिजे.

यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रमोद देशमुख म्हणाले डॉ. लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली अफार्म मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच मला सगरोळी भागामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. लोहिया यांचे कार्य आजही मानवलोक संस्था अविरतपणे चालवित आहे हे कौतुकास्पद आहे. हवामानातील बदलाची आव्हाने पेलण्यासाठी यापुढील काळात या संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

आ. नमिता मुंदडा या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, डॉ. लोहिया यांनी अन्यायाच्या विरोधात शेतकरी, मजुर व वंचितासाठी आपली हयात घातली. स्व. विमलताई मुंदडा यांनी डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या समवेत काम करून समाजातील विविध प्रश्न सोडविले. त्याच धर्तीवर आपण देखील अनिकेत लोहिया यांच्या सोबत वंचितासाठी काम करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले. सुत्रसंचालन अतुल कुलकर्णी, प्रा. सुकेशिनी जोगदंड व डॉ. रमा पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार मानवलोकचे सहकार्यवाह लालासाहेब आगळे यांनी मानले. या राष्ट्रीय परिषदेस ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंकुशराव काळदाते, जि. प. सदस्य डॉ. योगिनी थोरात, पानी फाऊंडेशन पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातून संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित आहेत.

प्लास्टीक मुक्तीला प्रारंभ

डॉ. लोहिया यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेत प्रमुख मान्यवरांच्या सत्कारासाठी खादी हार, कागदी फुले देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारातून प्लास्टीक मुक्तीला प्रारंभ झाल्याचे दिसून आले.

लातूरच्या अफार्म केन्द्राला डॉ. लोहिया यांच्या नावाची घोषणा

पुणे येथील अफार्मच्या बैठकीमध्ये लातूर येथील विभागीय प्रशिक्षण केन्द्रास डॉ. द्वारकादास लोहिया यांचे नाव देण्याचे सवार्नुमते ठरविण्यात आले होते. या नावाची घोषणा आज राष्ट्रीय परिषदेत अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी जाहीर केले.