अंबासाखर परिसरात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा
टीम AM : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून कोणत्याही राजकीय नेत्याचे न एकता आपली एकजूट कायम ठेवा, ती फुटू देऊ नका, असे आवाहन मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. अंबाजोगाई येथील अंबासाखर कारखाना परिसरात मराठा आरक्षणासाठी आरक्षणाचे योध्दा मनोज जरांगे पाटील यांची आज सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता विराट सभा झाली. या सभेत मनोज जरांगे पाटील हे प्रकृती ठिक नसताना देखील भाषणासाठी आले, व त्यांनी मराठा आरक्षणावर सविस्तरपणे जाहीर भाषण केले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभेतील भाषणात सांगितले की, मराठा समाजाने एकजुट ठेवली तर नक्कीच आरक्षण मिळणार आहे, त्यासाठी मराठा समाजातील बांधवांना सय्यम देखील ठेवावा लागणार आहे. मी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्ष करत आहे. माझ्या गोरगरीब मराठा समाजातील बांधवांना, मुलांना आरक्षण मिळावे, यासाठी मला कोणतेही पद नको आहे. शिंदे सरकारने गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप देखील त्यांनी सरसकट गुन्हे मागे घेतलेले नाहीत. हे गुन्हे लवकरात लवकर मागे घ्यावेत, अशी मी सरकारला विनंती करत आहे. माझ्या किडनी व लिव्हरवर सुज आहे, माझे शरीर मला साथ देत नाही, पण तुम्हा सर्वांना सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मी जीवाची बाजी लावत आहे. आपल्या मराठा समाजाची एकजुट फुटू देऊ नका, मी कोणतीही चुक करीत नसून मी माझ्या गोरगरीब मुलांसाठी, समाजाला न्याय देण्यासाठी लढत आहे.
आरक्षण देताना कोणतेही राजकारण करु नका
आरक्षण देताना कोणतेही राजकारण करु नका, आरक्षण जर भेटले तर मराठा समाजातील गोरगरीब मुलांचे कल्याण होणार अहे. आरक्षण मिळत नसल्याने जेंव्हा एका मार्कावरुन प्रवेश मिळण्याची संधी हुकते तेंव्हा मुलांचे व त्यांच्या आई – वडिलांचे जे डोळ्यातून अश्रू निघतात ते पाहिले जात नाही. केवळ आरक्षण नसल्यामुळे आज मराठा समाज उध्वस्त झाला असून तो सर्वच क्षेत्रात आता मागे गेला आहेे. 70 वर्षापुर्वी जर आरक्षण दिले असते तर मराठा समाज आज प्रगतशिल समाज म्हणून ओळखला गेला असता. मला डॉक्टर आराम करा असे म्हणत आहेत. तरी पण मी जीवाची पर्वा न करता तुम्हा सर्वांना जागृत करण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहे. मी आजही चार तासाच्या वर झोपत नाही. कारण मला मराठा समाजाच्या वेदना, दु:ख माहित आहेत.
भुजबळांना जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करायचे आहे
मी मराठा आरक्षणावर ठाम असून अशी संधी पुन्हा येणार नाही, हे सरकार जात संपविण्याच्या मार्गावर असून आपली जात संपलीतर आपल्याला कोणीच विचारणार नाही. जात वाचलीच पाहिजे, यासाठी सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. मराठा तरुणांनी व्यसनापासून लांब रहावे, असेही आवाहन मनोज जरांगे यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांचे कुणीही ऐकू नका, त्यांना जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करायचे आहे. आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळांचे काय करायचे ते आपण ठरवूया. आज नोंदी सापडल्यामुळे सुमारे 35 लाख मराठा तरुणांना आरक्षण मिळाले आहे. मराठा तरुणांच्या वेदना सर्वांनी समजल्या पाहिजेत. सात पिढ्या बरबाद झाल्या असून यापुढे तरी आपली आता बरबादी होऊ देऊ नका, आरडा – ओरड करुन आपणांस आरक्षण मिळणार नाही, त्यासाठी सर्वांनी संयम व शांतता ठेवावी. शांततेत आपणास आरक्षण मिळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.
80 टक्के लढाई जिंकलेली आहे
आपण आता 80 टक्के लढाई जिंकलेली आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरसकट मराठा आरक्षण मिळणारच आहे, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी आधी माझा समाज व नंतर माझे कुटुंब अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. खाऊन तर कुणीही जगेल, पण समाजासाठी आपण काहीतरी देणे असतो, या भावनेतून जीवनाची लढाई लढली पाहिजे. मराठा समाजातील आरक्षण मिळेपर्यंत बेसावध न राहता सावध रहावे. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असे सांगत शेवटी मनोज जरांगे यांनी सांगितले की, मला तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची, आशिर्वादाची, पाठबळाची नितांत गरज असून मी एक इंच पण मागे हटणार नाही, अशी ठाम ग्वाही देतो असे सांगितले. या सभेस विराट जनसमुदाय मोठ्या संख्येने हजर होता.