टीम AM : ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वैजनाथ अनंतराव काळे (वय 52) असे आत्महत्या केलेल्या लिपीकाचे नाव आहे. मयत वैजनाथ काळे हे ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात लिपीक म्हणून कार्यरत होते.
‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात आज सकाळी 9 वाजता सदरील घटना उघडकीस आली. वसतिगृहात सकाळी स्वच्छता कर्मचारी साफसफाई करित असतांना कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. बराच वेळ झाला तरी दरवाजा कोणी उघडत नसल्याने कर्मचाऱ्याने डोकावून पाहिले असता खोलीत वैजनाथ काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मयत वैजनाथ काळे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत.