बीड जिल्ह्यात मोठा फौजफाटा तैनात, शांतता राखण्याचे आवाहन

टीम AM : मराठा आरक्षण आंदोलनाला सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण लागले. जिल्ह्यात विविध ठिकाणी जाळपोळीच्या मॅरेथॉन घटना घडल्या. अचानक उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा पोलिसांचे बळ तोकडे पडले. मात्र, सायंकाळ पर्यंत बीड मधील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात फोर्स उपलब्ध झाला आहे.              

सायंकाळी बीडमध्ये राज्य राखीव दलाचे सुमारे 600 जवान उपलब्ध झाले असून याव्यतिरिक्त  होमगार्डचे 600 जवान उपलब्ध झाले आहेत. बीड शहर, माजलगाव, गेवराई, आष्टी, अंबाजोगाई आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेऊन कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात येत आहे.

दोषींवर कडक कारवाई होणार 

सोमवारी बीड जिल्ह्यात विशेषतः बीड आणि माजलगाव येथील अनुचित घटनांत शासकीय आणि खासगी मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले. समाजविघातक कारवाया तसेच जाळपोळ केलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे आणि शोध घेण्याचे काम सुरू झाले असून दोषींना शोधून त्यांच्यावर   कडक कारवाई करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची गय केली जाणार नाही असे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बीड शहर व जिल्ह्यात शांतता राखण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे.