टीम AM : बॉलीवूडचा ‘चॉकलेट हिरो’ असं बिरूद मिरवणारे अभिनेते विनोद मेहरा यांचा आज (30 ऑक्टोबर) स्मृतिदिन आहे. तीन दशकांच्या कारकिर्दीत विनोद मेहरा यांनी तब्बल 100 हून अधिक चित्रपट केले. बॉलिवूडच्या प्रत्येक टॉप अभिनेत्रीसोबत काम करणाऱ्या विनोद मेहरा यांचे सर्वाधिक चित्रपट हे अभिनेत्री रेखा यांच्यासोबत होते. अनेक चित्रपट एकत्र करत असताना दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि प्रेम फुलू लागलं होतं. त्यांनी एकमेकांशी सिक्रेट लग्न देखील केलं. मात्र, जगासमोर त्यांनी हे कधी मान्य केलं नाही.
बॉलिवूडची सौंदर्यवती रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांच्या लग्नाचं गुपित यासिर उस्मान यांच्या पुस्तकातून उघड झालं. लेखक यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी या गोष्टीचा उलगडा केला. रेखाच नव्हे, विनोद मेहरा यांनी तीन लग्न केली होती. याशिवाय त्यांची दोन प्रेमप्रकरण देखील चांगलीच चर्चेत होती. यासिर यांच्या पुस्तकात म्हंटलेय की, विनोद मेहरा यांनी कोलकाता येथे एका खाजगी समारंभात रेखाशी लग्न केले आणि त्यांना घरीही नेले. पण, विनोद यांच्या आईला हे आवडले नाही. रेखाला पाहून त्यांना राग आला.
विनोद मेहरा यांच्या आई रेखाला पाहून प्रचंड संतापल्या. मात्र, तरीही रेखा यांनी शांत राहून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी त्यांनी रेखा यांना दूर ढकललं आणि त्यांच्या श्रीमुखात भडकावली. विनोद मेहरा यांनी आईला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, परिस्थिती शांत न झाल्याने त्यांनी रेखा यांना परत घरी जाण्यास सांगितले. यामुळे त्यांचे रेखा यांच्यासोबत त्यांचे लग्न मोडले. यानंतर विनोद मेहरा यांच्या लग्नासाठी पुन्हा एकदा स्थळ शोधण्यास सुरुवात झाली.
यानंतर विनोद यांनी आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. एकीकडे ते एकापेक्षा एक हिट चित्रपट देत होते. तर, दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र चांगलेच विस्कळीत झाले होते. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अभिनेत्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या स्थितीसाठी जबाबदार धरले. यानंतर दोघांमध्ये दुरावा येऊ लागला. या दरम्यान विनोद मेहरा यांचे अभिनेत्री बिंदिया गोस्वामीवर प्रेम जडले. दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि काही काळानंतर विनोद मेहरा यांनी बिंदिया गोस्वामीसोबत गुपचूप लग्न केले.
त्यांच्या लग्नाची बातमी प्रचंड चर्चेत आली, तेव्हा दुसरी पत्नी मीनाने विनोद मेहरा यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. यावेळी बिंदिया गोस्वामी चांगल्याच घाबरल्या. यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी विनोद मेहरा आणि या धमक्यांना कंटाळून बिंदियाने जेपी दत्ता यांच्याशी लग्न केले. विनोद मेहरा यांनी दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर पुन्हा लग्न केले. मात्र, लग्नानंतर दोन वर्षांनी विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले, त्यांना अभिवादन.