टीम AM : आपल्या दमदार आवाजाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज 27 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. आयुष्यात यशाची चव चाखलेल्या अनुराधा पौडवाल यांनी अतिशय संघर्षमय काळ देखील पहिला आहे. कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अनुराधा पौडवाल सध्या मनोरंजन विश्वापासून खूप दूर गेल्या आहेत. त्या सध्या काय करतात ? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना देखील पडत असतो. चला तर जाणून घेऊया त्या सध्या काय करतायत…
गायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1952 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी ‘अभिमान’ चित्रपटातून आपल्या गायनाची सुरुवात केली. याच चित्रपटात त्यांनी काही संस्कृत श्लोक गायले होते. एक काळ असा होता, जेव्हा अनुराधा पौडवाल यांना दुसऱ्या लता मंगेशकर असंही म्हटलं जात होतं. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अनुराधा पौडवाल यांनी पंजाबी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलगू, उडिया आणि नेपाळी भाषांमध्येही भरपूर गाणी गायली आहेत.
लहानपणापासूनच अनुराधा पौडवाल यांना गाण्यांची आवड होती. ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘बेटा’ या चित्रपटांसाठी त्यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. अनुराधा यांनी केवळ बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केले नाही, तर भजन गायनातही नाव कमावले. गायिका अनुराधा यांचे लग्न संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झाले होते. अरुण पौडवाल हे एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. या जोडीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती.
मात्र, 1991 मध्ये त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अनुराधा यांच्यावर पडली. पतीच्या अकाली निधनाने त्या खचून गेल्या होत्या. दरम्यान त्यांची भेट गुलशन कुमार यांच्याशी झाली आणि त्यांना गुलशन यांची साथ मिळाली. अनुराधा यांनी टी सीरीजसाठी अनेक गाणी गायली. या दरम्यान, त्यांच्या आणि गुलशन कुमार यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या.
पतीच्या निधनानंतर त्यांची दोन मुले, मुलगा आदित्य आणि मुलगी कविता हाच त्यांचा एकमेव आधार होता. मात्र, 12 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा मुलगा आदित्यचा मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. आदित्यच्या मृत्यूने अनुराधा यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. मात्र, यातून त्यांना त्यांच्या मुलीने सावरले. आता अनुराधा पौडवाल काही कार्यक्रमांमध्ये गाणी गातात. यासोबतच त्या काही टीव्ही शो मध्येही पाहुण्या म्हणून हजेरी लावतात. मात्र, त्याव्यतिरिक्त त्यांनी मनोरंजन विश्वातून काढता पाय घेतला आहे.