भीषण अपघात : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, 2 जणांचा मृत्यू

टीम AM : बोरीसावरगाव – अंबाजोगाई रस्त्यावर अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने सदरील अपघात घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले [वय 37] आणि वासुदेव अनंत देशपांडे [वय 43] हे दोघे बुधवारी [दि.18] रात्री 11:30 च्या दरम्यान बोरीसावरगावहून अंबाजोगाईला निघालेले असताना त्यांची दुचाकी खटकळी पुलाजवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदरील घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे  अंमलदार बडे यांनी पुढील कार्यवाही करत त्यांना अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि त्या ठिकाणी दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरील अपघात नेमका कसा घडला ? याचा तपास एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.