हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण – भावासह तरुणाचा बुडून मृत्यू

टीम AM : दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी गेलेली दोघे सख्खे बहीण भाऊ आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना (दि. 14) दुपारी केज – बीड रोडवरील रमाईनगर येथील तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर घडली. वैष्णवी गजानन वाघमारे (वय 12), सोमेश्वर गजानन वाघमारे (वय 15), अविनाश संतोष घोडके (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, केज शहरातील गणेशनगर भागात वाघमारे व घोडके ही दोन्ही कुटुंबे शेजारी राहतात. दोन्ही कुटुंबे  दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी केज – बीड रोडवरील रमाई नगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर गेली होती. कपडे धुवून झाल्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास वैष्णवी गजानन वाघमारे (वय 12) आणि सोमेश्वर गजानन वाघमारे (वय 15) पाण्यात बुडू लागली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई उषा गजानन वाघमारे हिने आरडाओरडा केला. त्यानंतर मुलांना वाचविण्यासाठी स्वतः पाण्यात उतरली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेला अविनाश संतोष घोडके (वय 18) याने पाण्यात उडी घेतली. त्याला उषा हिला वाचविण्यात यश आले. मात्र, सोमेश्वर व वैष्णवी यांना वाचविताना त्याचाही खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, मतीन शेख, माळी व तलाठी साहिल इनामदार घटनास्थळी हजर झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले.

मृत तिघेही सामान्य कुटुंबातील

वैष्णवी व सोमेश्वर घोडके यांचे वडील सुतारकाम करतात. तर अविनाश घोडके याचे मंगळवार पेठेत फुटवेअरचे दुकान आहे. ही दोन्ही कुटुंबे अत्यंत सामान्य परिस्थितीतील होती. वसंत महाविद्यालयाजवळील गणेशनगर भागात राहत होती.