टीम AM : अंबाजोगाई – कारखाना रोडवर अपघाताची घटना समोर आली आहे. कार – दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सय्यद अरबाज (वय 23) रा. क्रांतीनगर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता घडला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, मयत सय्यद अरबाज आणि त्याचा मेहुणा शेख वहाब नवाब काम आटोपून अंबासाखर कारखाना येथून घरी अंबाजोगाईकडे दुचाकीवरुन (MH 44 Y – 6404) येत होते. तिरंगा धाब्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील मारुती सुझुकी कंपनीच्या डिझायर कारने (MH12 US – 9513) अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वार कारला धडकला. यात दुचाकीस्वार वहाब शेख जोराच्या झटक्याने बाजूला पडला. परंतू, मागे बसलेला त्याचा मेहुणा सय्यद अरबाज कारच्या दरवाज्याला जोरात धडकला. यामुळे सय्यद अरबाज याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतू, काही वेळानंतर डॉक्टरांनी सय्यद अरबाज याला मृत घोषित केले. या घटनेमुळे क्रांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.