धक्कादायक : मोटार लावताना लागला शॉक, विद्यार्थ्याचा मृत्यू, देवळा येथे घडली घटना

टीम AM : नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार लावताना विद्यार्थ्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे देवळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुदाम चंद्रकांत पवार (वय 14) असं शॉक लागून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गावातील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवारी शाळा सुटल्यावर सुदाम घरी आला होता, यावेळी घरी असलेल्या नळाला पाणी आले होते. आईला मदत करण्यासाठी त्याने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत होता. यावेळी शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने ‘स्वाराती’ रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

सुदामचे वडील चंद्रकांत पवार हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुदाम हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.