मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : महाविकास आघाडी
टीम AM : बीड जिल्ह्यात 40 दिवसांपासून अधिक कालावधीत समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी, 100 टक्के पिक विमा मंजुर करावा, 25 टक्के जोखीम अग्रीम देण्यात यावे, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्यांचे वीज बील माफ करावे, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे, एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत, यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवार, दि. 5 सप्टेंबर रोजी शेतकर्यांच्या ‘जनआक्रोश मोर्चा’ चे आयोजन केले आहे.
या मोर्चात शेतकरी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. या पत्रकार परिषदेला राजेसाहेब देशमुख, माजी आ. पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, शिवसेनेचे राजेभाऊ लोमटे, मदन परदेशी, व्यंकटेश चामणर या प्रमुख नेत्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.