परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान
घाटनांदूर : घाटनांदूर परिसरात काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे. गेल्या चार दिवसापासून परतीच्या पावसाने दमदार हजरी लावल्याने व सतत पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीस आलेल्या सोयाबीन, संकरित ज्वारी, मका या पिकास मोठा फटका बसला आहे. परिसरात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगाला सततच्या पावसामुळे अंकुर फुटले आहेत. तर संकरित ज्वारी, मका पिके शेतात उभे असून कणसालाच अंकुर फुटल्याने मोठे नुकसान झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे. आता शेतकऱ्यास शासकीय मदतीवर भिस्त आहे. तर तात्काळ विमा कंपनीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.