घटनेच्या पाच तासातच बर्दापुर पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानेच बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याचा खून केला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावालगत असलेल्या शेतामध्ये बुधवारी रात्री 1.30 वाजता घडली. साहेब जानुखाँ पठाण (वय 42) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शमिमबी साहेब पठाण (वय 39) यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे पुस परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर बर्दापुर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली आणि घटनेच्या पाच तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात बर्दापुर पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास बर्दापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महिंद्रसिंग ठाकुर हे करीत आहेत.