टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पुन्हा मैदानात पहायला मिळणार आहेत. शरद पवार यांचा दुसरा दौरा निश्चित झाला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली, त्यांनी महायुतीला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी देखील महायुतीला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या बंडखोरीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी महाराष्ट्र व्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. शरद पवार यांची पहिली सभा ही छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये पार पडली. त्यानंतर आता शरद पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 17 ऑगस्टपासून शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 17 ऑगस्टला शरद पवार हे बीडमध्ये सभा घेणार आहेत.
बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंखे यांच्या मतदारसंघामध्ये शरद पवार सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर चार सप्टेंबरपासून शरद पवारांच्या जळगाव दौऱ्याला सुरुवात होणार आहे. शरद पवार या सभांमध्ये नेमकं काय बोलणार ? काय भूमिका मांडणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.