अभिनेते मनोज कुमार ‘या’ अभिनेत्रीचे ‘ते’ उपकार फेडू शकले नाहीत.. वाचा नेमकं काय घडलं होतं ?

टीम AM : अभिनेते मनोज कुमार यांचा आज जन्मदिन आहे. 24 जुलै 1937 साली बॉलिवूड अभिनेता मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. मनोज कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक देशप्रेमावर आधारित चित्रपट केले. असे सांगितले जाते की, शहीद भगत सिंग मनोज कुमार यांची प्रेरणा होते. 

मनोज कुमार यांनी देशभक्तिपर विविध चित्रपट करत ते अनेकांसाठी प्रेरणा बनले होते. एक देशभक्त अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती, त्यांना भारत कुमार म्हणून देखील संबोधले जायचे.

60 आणि 70 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचा बोलबाला होता. त्यांनी मार्च 2014 मध्ये या जगाचा निरोप घेतला. दरम्यान, त्यावेळी एका मुलाखतीमध्ये मनोज कुमार यांनी नंदा यांची एक आठवण सांगितली होती. त्यांच्यासाठी ती फार भावुक आठवण होती. मनोज कुमार सांगतात की, त्यांना ‘शोर’ या चित्रपटासाठी शर्मिला टागोर यांना कास्ट करायचे होते, पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर स्मिता पाटील यांनीही तो सिनेमा नाकारला. त्यावेळी मनोज कुमार यांच्या पत्नी शशी यांनी त्यांना नंदा यांच्याशी बोलण्यास सांगितले.

मनोज कुमार यांनी पुढे सांगितले की, नंदा फार मोठ्या स्टार होत्या. इतक्या अभिनेत्रींनी नाकारलेला सिनेमा त्यांना कसा ऑफर करायचा, असा पेचप्रसंग त्यांच्यासमोर उभा राहीला. मनोज कुमार सांगतात, ‘मग मी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरुन नंदाजींना फोन केला. त्या दोघींची चांगली मैत्री होती. त्यावेळी नंदाजींनी मला घरी बोलावून सांगितले की, मी तुझा हा चित्रपट एका अटीवर करेन आणि ती अट म्हणजे या चित्रपटासाठी मी तुझ्याकडून एक रुपयाही घेणार नाही.’ या घटनेबाबत सांगताना मनोज कुमार म्हणतात की, ‘एखाद्याचे उपकार तुम्ही फेडू शकत नाहीत, पण मी नंदाजींचे हे उपकार फेडण्याचा प्रयत्न केला होता, जे शक्य झालं नाही.’

मनोज कुमार यांच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं तर त्यांनी अनेक हिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. यामध्ये ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘शहीद’, ‘हिमालय की गोद में’, ‘गुमनाम’, ‘पत्थर के सनम’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांति’ या सिनेमांची नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मनोज कुमार यांनी राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार याशिवाय भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या पद्मश्री पुरस्कारावर देखील आपले नाव कोरले आहे.