माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती ? इरसालगड येथे दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली

टीम AM : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याचे समोर आलेय. प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे तीस ते 40 घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. बचावकार्य अद्याप सुरु आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली.

इरसालगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरसालगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.