बोगस बियाणांच्या समस्येला आळा घालण्यासाठी कायदा कडक करण्याच्या सूचना : देवेंद्र फडणवीस

टीम AM : राज्याच्या अनेक भागात कमी पाऊस पडला असून, शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं काल एका समितीची स्थापना केल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या असल्याचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर फडणवीस बोलत होते.

हवामान विभागाच्या अहवालाप्रमाणे पुढचा आठवडाभर राज्यात पाऊस पडेल, त्या काळात उर्वरित पेरण्या होतील, असं ते म्हणाले. बोगस बियाणांच्या समस्येला आळा घालण्यासाठी कायदा कडक करण्याच्या सूचना दिल्या असून, बियाण्यांना जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत आणलं जाईल, त्यामुळे बोगस बियाणे विकणं हा अजामीनपात्र गुन्हा होईल, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

पाऊस, पेरण्या आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत थोरात यांनी या मुद्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी सभागृहात अर्थमंत्री अजित पवार यांनी, 2023 – 24 च्या 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यानंतर अध्यक्षांनी, सदनातल्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

विधानपरिषद कामकाज

विधानपरिषदेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी उपसभापतींवर आक्षेप घेतला. उपसभापती नीलम गोर्हे यांच्या पक्ष बदलावरून गदारोळ करत विरोधकांनी सभात्याग केला. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी, सभापतींना कोणताही पक्ष नसतो असं सांगत, हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, त्यावरून विरोधक आक्रमक झाले. सभापतींवर आक्षेप घेता येत नाही, नियमबाह्य कामकाज चालवता येणार नाही असं सांगत, नोटीस न देता हा मुद्दा मांडता येणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दानवे अल्पमतात आले आहेत. त्यामुळे त्यांनाच या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं ते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.