शिक्षण मंडळाचे नियम ऐकल्यानंतर बापलेकीचे अश्रू अनावर
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील रिक्षाचालक रुबाब पठाण यांची मुलगी मुस्कान हिने कोणतीही शिकवणी नं लावता मिळेल त्या वेळेत मोबाईलवर अभ्यास करुन ‘नीट’ मध्ये 570 गुण घेतल्याने मुस्कानचे सर्वत्र कौतुक होत असताना बारावीत 46.66 टक्के मिळाल्यामुळे तिची वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार आहे. अर्ज भरून इम्प्रूव्हमेंट परीक्षा देता यावी, यासाठी बापलेकीने आधार माणुसकीचा उपक्रमांचे प्रमूख ॲड. संतोष पवार यांना सोबत घेऊन मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण कार्यालय गाठले. नियम ऐकल्यानंतर इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बापलेकीचे अश्रू अनावर झाले आहेत.
सुगावचे रहिवाशी अल्पभुधारक शेतकरी रूबाब पठाण यांना अल्पशी शेती असल्यामुळे ते ऑटोरिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाढा, मुलाबाळाचे शिक्षण करत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत असताना सुद्धा आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी त्यांची आपेक्षा होती. मुस्कान हिने शिकवणी न लावताच मोबाईल यू – ट्यूबवर अभ्यास करून वैद्यकीयच्या ‘नीट’ मध्ये 570 गुण प्राप्त केल्याने आपली मुलगी आत्ता डॉक्टर होणार याचा आनंद रुबाब पठाण व त्यांच्या कुटुंबीयांना झाला होता. रिक्षाचालकाची मुलगी डॉक्टर होतेय म्हणून तिचे अनेकांनी गोड कौतुक केले. ‘नीट’ परीक्षेत तब्बल 570 गुण घेतले खरे पण बारावीच्या परीक्षेत 46.66 टक्के गुण मिळाल्यामुळे तिचे डॉक्टरकीचे स्वप्न आधुरे राहाते की काय ? या चिंतेने पठाण कुटूंबीये त्रस्त झाले आहेत.
खोलेश्वर महाविद्यालयाची मुस्कान विद्यार्थीनी आहे. प्राचार्यांनी शिक्षण मंडळाच्या नावाने पत्र देत मुस्कानला बारावीच्या परीक्षेत इम्प्रुव्हमेंटची संधी देण्याची मागणी केली होती. ते पत्र घेऊन ॲड. संतोष पवार, मुस्कान व तिचे वडील विनंती अर्ज घेऊन इम्प्रूव्हमेंट परीक्षा देता यावी, यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय गाठले. 2020 मध्ये बारावीची परिक्षा दिली होती, परंतू त्यानंतर सलग येणाऱ्या दोन परिक्षा कोरोनामुळे देऊ शकता आल्या नाहीत, त्यामुळे दोन वर्षांच्या गॅपमुळे इम्प्रुव्हमेंट परीक्षा बोर्डाच्या नियमामुळे देता येणार नसल्याचे तेथे स्पष्ट झाले. कोणत्याही विद्यार्थ्यास इम्प्रुव्हमेंटची संधी दिलेल्या परीक्षेनंतर होणाऱ्या सलग दोन परीक्षेसाठी संधी दिली जाते, तसे नियम आहेत. त्या नियमात बदल करण्याचा अधिकार विभागीय मंडळाला नाही. त्याविषयीचा निर्णय उच्चस्तरीय पातळीवरच होऊ शकतो, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव यांनी दिली. नियम ऐकल्यानंतर इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार असल्याने बापलेकीचे अश्रू अनावर झाले आहेत.
वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार ?
अर्ज भरून इम्प्रूव्हमेंट परीक्षा देता यावी, यासाठी बापलेकीने मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय गाठले. कार्यालयात मिळालेल्या गुणाबाबत चर्चा केली. शिक्षण विभागाच्या अधिकारी यांचा नियम ऐकल्यानंतर इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुस्कानचे अश्रू अनावर झाले
मुस्कानच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले
मुस्कान पठाण ही खोलेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. मार्च 2020 मध्ये दिलेल्या बारावीच्या परीक्षेत तिला 46.66 टक्के गुण मिळाले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीत किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. हे तिला व तिच्या अशिक्षीत असलेल्या आई – वडीलांना माहित नव्हते. वंचित कुटुंबातील गुणवंत मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष पवार यांची भेट घेऊन त्यात काही बदल करता येतील का ? यासाठी प्रयत्न केले, पण ते असफल झाले. सुगाव परळी मतदारसंघात येते. गरिब कुटूंबातील मुलगी डॉक्टर होणार हे निश्चित आहे. पण तिने डॉक्टर व्हायचे म्हणून दिवसरात्र अभ्यास करुण ‘नीट’ मध्ये 570 गुण मिळवले खरे पण बारावीत 50 टक्क्यापेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तिची संधी हुकणार आहे. मुस्कानचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करण्याची मागणी पठाण कुंटूबीये करत आहेत.
आधार माणुसकीचा मिळतोय आधार
वंचित कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष पवार हे मुस्कान डॉक्टर झाली पाहिजे, यासाठी लागेल ती मदत आधार माणुसकीचा माध्यमातून करत आहेत. शासनाने गांभीर्याने घेतले तर मुस्कान डॉक्टर होऊ शकते. गांभीर्याने नाही घेतले तर मात्र तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याची खंत मनात कायम राहणार आहे. – ॲड. संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते