टीम AM : हॉटेल व्यावसायिक प्रसाद प्रभाकर पाठक (वय 37) यांनी आनंदनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. व्यापारी प्रसाद पाठक हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
पाठक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत ‘हा सारा नियतीचा खेळ, ज्यांनी मदत केली त्यांचे आभार, ज्यांनी त्रास दिला त्यांचे पण आभार. असा मजकूर लिहिला आहे.
अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या पाठक यांनी आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांनी घटना स्थळला भेट दिली आणि पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, छोटा तीन वर्षाचा मुलगा व एक भाऊ असा परिवार आहे.
सायंकाळी सहा वाजता प्रसाद पाठक यांच्या पार्थिवावर रविवार पेठ परिसरातील बोरुळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.