अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रमेश आडसकर तर व्हा. चेअरमनपदी दत्ता पाटील

टीम AM : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची बिनविरोध निवडून पार पडली. आज शनिवारी चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीसाठी विशेष बैठक बोलावली होती. यामध्ये चेअरमनपदी रमेश आडसकर यांची तर व्हा. चेअरमनपदी दत्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक लागली होती. कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून निवडणूकीचा खर्च परवडणारा नव्हता, यामुळे रमेश आडसकर यांनी कट्टर विरोधक दत्ता पाटील यांना सोबत घेऊन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढली. यानंतर आता चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडीकडे ऊस उत्पादक शेतकरी, शेअर्स धारकांचे लक्ष लागले होते. 

आज शनिवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक बोलवण्यात आली. यावेळी सर्वानुमते चेअरमन पदासाठी रमेश आडसकर आणि व्हा. चेअरमन पदासाठी दत्ता पाटील यांचे एक – एक अर्ज आले. त्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन, व्हा. चेअरमन पदांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.