टीम AM : राज्यात सत्तांतर होऊन एक वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मात्र सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यात तब्बल 391 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
यात बीड, लातूर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ दहा कुटुंबियांनाच शासनाची आर्थिक मदत मिळाली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची अवहेलना होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत असते. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत असतात. परंतू तरी देखील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असल्याने तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आता सरकार बदलल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधारी भाजप – शिंदे गटावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळं आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.
मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. याशिवाय सावकारी आणि निसर्गाचा लहरीपणाही शेतकऱ्यांच्या दुर्दशेला कारणीभूत असतो. त्यामुळं मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यांच्या काळात 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मराठवाड्यात सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करत असून त्यामुळं अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठवाड्यात एप्रिल महिन्यात 89 आणि मे महिन्यात 88 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.