महाराष्ट्र वनविभागात 2 हजार 417 पदांसाठी मेगा भरती : आजपासून करा अर्ज

टीम AM : महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती होणार असून, राज्यातील 2 हजार 417 पदांसाठी शनिवार (दि.10) पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. 30 जूनपर्यंत इच्छुक उमेदवारांना  www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

या भरतीप्रक्रियेनंतर अतिरिक्त पदांचा भार असलेल्या वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच राज्यातील वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.

गेल्या दीड वर्षापासून वनविभागातील भरतीप्रक्रिया रखडली होती. तत्कालीन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त 2 हजार 762 जागांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर भरतीप्रक्रियेला ब्रेक लागला होता. अखेर वनविभागाचे नागपूर येथील मानव संसाधन व्यवस्थापनचे उपवनसंरक्षक डॉ. एस. आर. कुमारस्वामी यांनी भरतीप्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे वनविभागाच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वनविभागाची भरतीप्रक्रिया राज्यस्तरीय आणि प्रादेशिक पदानुसार राबविली जाणार आहे. राज्यस्तरीय पदांमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा, तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश असणार आहे. वनसंपदेच्या संरक्षणाची धुरा असणारे वनरक्षकांचे सर्वाधिक 2 हजार 138 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्काच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहे.

दरम्यान, लेखापाल, वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी, कनिष्ठ अभियंता या पदासाठी 200 गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा होणार आहे. लघुलेखक आणि सर्वेक्षक या पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून, 45 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना 80 गुणांची व्यावसायिक चाचणी द्यावी लागणार आहे. वनरक्षक पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर 80 गुणांसाठी धाव चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना 5 तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेत पार करावे लागणार आहे.

पदनिहाय उपलब्ध संख्या

पदनाम – संख्या

लघुलेखक (उच्च) – 13

लघुलेखक (निम्न) – 23

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 08

वरिष्ठ सांख्यिकी सहायक – 05

कनिष्ठ सांख्यिकी सहायक – 15

लेखापाल – 129

सर्वेक्षक – 86

वनरक्षक – 2,138