टीम AM : ‘एमबीबीएस’ च्या पहिल्या वर्षात चार वेळा नापास झाल्याच्या नैराश्यातून आकाश संतोष जोगदंड (रा. चौसाळा, जि. बीड) या तरुणाने सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सावरकर मैदानाजवळील एका हॉटेलच्या खोलीत सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.
‘आईच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही, आई काळजी घे, बहिणीचा नीट संभाळ कर. माझ्या मृत्यूची वार्ता अगोदर माझे मामा व मित्रांना द्या. कारण आई व बहिणीला धक्का बसेल. माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये’ असे आकाशने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. आकाश हा सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होता. आकाशने 2020 मध्ये प्रवेश घेतला होता.
एप्रिल – मे मध्ये प्रथम वर्षातील शेवटची संधी असलेली परीक्षा देऊन तो गावी गेला. मे च्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागला. या चौथ्या संधीतही तो अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे आकाश नैराश्यात होता. चार ते पाच दिवसांपूर्वी तो गावाकडून सोलापुरात आला, मात्र कालेजच्या होस्टेलमध्ये गेला नाही. तर तो हॉटेलमध्ये राहिला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.