कार्यकर्ता ओरडून म्हणाला पक्ष स्थापन करा, पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात खळबळ

टीम AM : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पक्ष सोडणार, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. आज त्या भूमिका जाहीर करतील असं बोललं जात होतं. त्यावर पंकजा मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज बीडच्या परळीत गोपीनाथ गड येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये राहणार की नाही, याबद्दल थेटपणे भाष्य केलं होतं.

पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असतांना एक कार्यकर्ता उठला आणि पक्ष स्थापन करा, अशी मागणी करु लागला. यानंतर पंकजा मुंडे यांनी निर्णय घेण्यासाठी मला आडपडद्याची गरज नसल्याचं सांगून मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

‘निर्णय घेण्यासाठी मला आडपडद्याची गरज नाही. मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या सगळ्या घटनांशी मुक्त चर्चा करेन. त्यांना विचारणार आहे की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, याची स्पष्टता आल्याशिवाय मला पुढे लोकांना विश्वास बांधून देता येणार नाही. त्यानंतर काय होईल ते असंच मंचावर सांगेन’ असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.