भीषण अपघात : एक्सप्रेस – मालगाडीची समोरासमोर धडक, 238 जणांचा मृत्यू, 900 जखमी

टीम AM : ओडिशातील बालासोर येथे काल दि. 2 जूनला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. प्राप्त माहितीनुसार बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (12841) आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात तब्बल 238 हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

याशिवाय तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर असंख्य प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ही धडक एवढी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली. ज्यानंतर मालगाडीचे अनेक डबे ट्रेनच्या वरच्या भागावर गेले. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडलचे सात डबे रुळावरून घसरले आहेत.

बालासोरमधील बहनागा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. दरम्यान घटनास्थळी रेल्वे प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून वेगाने बचावकार्य सुरु आहे.