दहावीचा निकाल जाहीर : 12 जूनपर्यंत करता येणार गुणांची पडताळणी

टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी निकालात घट झाली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबासाईटवर आपले व्यक्तिगत निकाल पाहता येत आहेत.

(Advt.)

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 2 जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

‘या’ संकेतस्थळावर मिळेल अतिरिक्त माहिती

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

– www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.

12 जूनपर्यंत करता येणार गुणांची पडताळणी

निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल.

हा अर्ज अधिकृत संकेतस्थळ http://verification.mh-ssc.ac.in यावर करता येईल. गुणपडताळणीसाठी 3 जून ते 12 जूनपर्यंत अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जून ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.