अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी दिला महत्वपूर्ण निकाल
टीम AM : आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहरातील डॉ. मोहम्मद इक्बाल माध्यमिक शाळेच्या संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी दिले आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक हे मुख्याध्यापक म्हणून डॉ. मोहम्मद इक्बाल माध्यमिक शाळा, दवाखाना रोड, अंबाजोगाई या ठिकाणी कार्यरत आहेत. आरोपी नामे शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक यांचा विवाह शाहिदा बेगम शमशुद्दीन सोबत झाला होता.
शाहिदा बेगम या देखील सदर शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, याप्रकरणातील आरोपीची पत्नी शाहिदा बेगम शमशुद्दीन यांचे आजारपणामुळे सन 2009 मध्ये निधन झाले. आरोपीची पत्नी मयत झाल्यानंतर आरोपी नामे शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक (मुख्याध्यापक) यांनी महाराष्ट्र शासन वित्त विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, बीड यांच्याकडे मयत पत्नी शाहिदा बेगम त्यांच्या पश्चात मयत पत्नीची कुटुंब निवृत्ती वेतन पी. पी. ओ. क्र. 14130899259 अन्वये 02.10.2009 पासून मयत पत्नीची पेंन्शन आरोपीने स्वतःला लागू करून घेतली. मयत पत्नीची येणारी पेंन्शन ही आरोपी याने त्याचे स्वतःचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्याच्या स्वतःच्या खात्यावर सदर पेंन्शनची रक्कम हस्तांतरित करून घेतली आहे. त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने त्याचा दुसरा विवाह शाहिस्ता बेगम पिता असीम (सहशिक्षिका) यांच्या सोबत केला.
आरोपी याने दुसरी पत्नी शाहिस्ता बेगम सोबत झालेला दुसरा विवाह हा शासनापासून लपवून ठेवला. दुसरा विवाह झाल्यानंतर पहिल्या मयत पत्नीची पेंन्शन ही नियमाप्रमाणे आरोपी शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक याने बंद करून घेणे आवश्यक होते. तसेच ही बाब देखील शासनास निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. परंतू, आरोपी शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक यानी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून, स्वतःच्या आर्थिक फायदा व्हावा, या करिता, पहिल्या मयत पत्नीची स्वतःचे नांवे येणारी पेंन्शन बंद न करता जाणून – बुजून चालूच ठेवली. येणारा पेंन्शनचा सर्व पैसा स्वतःकडेच ठेवून घेतला. ही बाब आरोपीने शासनास जाणून – बुजून लपवून ठेवली आणि एकप्रकारे शासनाचे पैसे हडप केले. या प्रकरणी तक्रारी नंतर अप्पर कोषागार अधिकारी कार्यालय, बीड यांनी सखोल चौकशी केल्यावरून स्पष्ट दिसून आले की, शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक यानी पुन:र्विवाह केल्या असल्याबाबत या कार्यालयास अवगत न करता माहे 08/ 2022 पर्यंत मंजूर दराने कुटुंब निवृत्ती वेतन या कार्यालयाकडून घेणे ही बाब अतिशय गंभीर आहे.
दिनांक 02.10.2009 ते 31.08.2022 या कालावधीत कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम रूपये 16,38,051/- व सातवा वेतन आयोगाचे तीन हप्ते रूपये 3,00303/ असे एकूण रूपये 19,38,354 /- रक्कम घेतली आहे. आरोपी नामे शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक यानी स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा याकरिता, चक्क शासनाची दिशाभूल व फसवणूक करून, कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम हडप करून, दिनांक 02.10.2009 ते 31.08.2022 या कालावधीत पहिली पत्नी मयत झाल्यानंतर तिची कुटुंब निवृत्ती वेतन रक्कम स्वतःच्या नांवे हस्तांतरित केली. तसेच दुसरा विवाह केला व तो शासनापासून लपवून पहिल्या मयत पत्नीच्या कुटुंब निवृत्ती वेतनाचा फायदा घेतला आणि कुटुंब निवृत्ती वेतनाची एकूण रक्कम रूपये 19,38,354 /- ही स्वतः गिळंकृत करून, आर्थिक अपहार करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला. या प्रकरणी सदर आरोपी विरूद्ध तात्काळ गुन्हा नोंद करण्याकरिता पोलिस अधीक्षक, बीड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड, अप्पर कोषागार अधिकारी, कार्यालय, बीड यांना दिनांक 14.12.2022 रोजी या प्रकरणातील फिर्यादी मुजम्मील जफर मोहियोद्दीन खतीब यांनी लेखी तक्रार दिली.
परंतू, या प्रकरणी शालेय प्रशासनाकडून आरोपींविरूद्ध कोणतीही कार्यवाही न करता, तक्रार अर्जाची साधी दखलही घेण्यात आली नाही. म्हणून अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांच्या कोर्टात क्रि. फौ. अ. क्र. 637 / 2023 अन्वये फिर्यादी मुजम्मिल जफर मोहियोद्दिन खतीब यांनी मुख्याध्यापकांविरूद्ध कलम 420, 421, 466, 467, 468, 471, भा.दं.वी. प्रमाणे गुन्हा नोंद करावा म्हणून अर्ज दाखल केला. येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित मुख्याध्यापक याच्या विरूद्ध कलम 156 (3) सी.आर.पी.सी.अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.