दोनशे रुपयांची गोष्ट !

जावेद अख्तर यांच्यासाठी तो खडतर काळ होता. त्या परिस्थितीत त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याकडून मदत घ्यायचं ठरवलं. फोन केला आणि वेळ घेऊन भेटीसाठी गेले.

त्यादिवशी साहिर यांनी जावेद यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं आणि विचारलं, ‘तरुण मित्रा, निराश का आहेस ?’ जावेद म्हणाले, ‘अडचणीत आहे. जवळचे पैसे संपत आलेत. मला काही काम दिलंत तर उपकार होतील.’

जावेद अख्तर सांगतात की, साहिर यांची एक खास सवय होती. ते जेव्हा बेचैन असत, तेव्हा पँटच्या मागच्या खिशातून कंगवा काढून केस विंचरायला लागत. त्यावेळीही त्यांनी तसेच केले. थोडा वेळ विचार केला आणि आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘नक्कीच. फकिराकडं काय आहे आणि काय करू शकतो ते बघतो आधी.’

आणि जवळच्या टेबलाकडं निर्देश करुन म्हणाले, ‘मीही वाईट दिवस बघितलेत मित्रा, तूर्तास हे राहूदे. बघूया काय करता येईल’ जावेद अख्तर यांनी बघितलं तर टेबलावर दोनशे रुपये ठेवले होते. ते पैसे जावेद यांच्या हातातही देऊ शकले असते, परंतु ती त्या माणसाची संवेदनशीलता होती, की समोरच्याला पैसे घेताना वाईट वाटू नये. पैसे देतानाही साहिर यांनी जावेद यांच्या डोळ्यात पाहणं टाळलं होतं.

साहिर यांच्यासोबत जावेद यांचे उठणेबसणे वाढले. त्रिशूल, दीवार, काला पत्थर यासारख्या चित्रपटांची कथा सलीम – जावेद यांची होती, तर गाणी साहिर यांची. त्यामुळं भेटणं, चर्चा नित्याच्या होत्या. यादरम्यान गंमतीनं जावेद अधुनमधून म्हणायचे, ‘साहिरसाब, तुमचे दोनशे रुपये माझ्याकडं आहेत. देऊ शकतो, पण देणार नाही.’ साहिर हसायचे. बैठकीतली मंडळी विचारायची की, ‘कसले दोनशे रुपये ?‘, तेव्हा साहिर म्हणायचे, ‘ते यांनाच विचारा’ हे असं अनेक वर्षं चालत राहिलं.

25 ऑक्टोबर 1980 ला रात्री साहिर लुधियानवी यांचं हृदयविकारानं निधन झालं. जावेद यांना बातमी ऐकून धक्का बसला. तातडीनं ते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. 

रात्रभर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. जुहू दफनभूमीत दफनविधीची तयारी करण्यात आली. भल्या सकाळी मुस्लिम रीतिरिवाजानुसार त्यांचा दफनविधी झाला. सोबत आलेले लोक थोड्या वेळानं निघून गेले. परंतु जावेद अख्तर खूप वेळ तिथं बसून राहिले. बऱ्याच वेळानं ते उठले आणि डबडबल्या डोळ्यांनी तिथून निघाले.

जुहू कब्रस्तानातून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांना कुणीतरी हाक मारली. जावेद यांनी वळून पाहिलं तर साहिर यांचे एक जिवलग मित्र अशफाकसाहेब होते.

अशफाक गडबडीनं येत होते. त्यांनी नाइट सूट परिधान केला होता. त्यांना सकाळीसकाळी बातमी कळली होती आणि तसेच ते घरातून निघाले होते. आल्याआल्या ते जावेद यांना म्हणाले, ‘तुमच्याकडं थोडे पैसे आहेत का ? त्या कबर बनवणाऱ्याला द्यायचे आहेत, मी गडबडीनं पैसे न घेताच आलो.’

जावेद यांनी खिशातून पाकिट काढलं आणि विचारलं, ‘किती रुपये द्यायचे आहेत ?’

ते म्हणाले, ‘दोनशे रुपये !’

अनिल जनविजय (अनुवाद : विजय चोरमारे)