टीम AM : मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमध्ये विभागात काल पाच जणांचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश गावांत काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कळमनुरी, वरूड, जवळाबाजार, वाकोडी, रामेश्वरतांडा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हळद काढणी आणि वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात काल अवकाळी पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह पाऊस पडला. जालना जिल्ह्यातही विरेगाव, रामनगर परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या मुबारकपूर इथं आरुषी राठोड या 13 वर्षीय मुलीचा, तर तगरखेडा इथं राजाप्पा कल्याणे या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. माहूर तालुक्यात सातघरी इथं घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड अंगावर पडल्यानं सोनुबाई पवार या महिलेचा मृत्यू झाला. मालटेकडी परिसरातल्या कामठा इथं वीज पडून शेख वजीर शेख चांद यांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात पांगरी तालुक्यातही एका मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
पिकांचं मोठं नुकसान
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार आठ शेतकऱ्यांच्या पाच हजार 487 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात गारपीटीचा फटका बसला असून, गहू पिकासह मोसंबी, आंबा या फळपिकांचं नुकसान झालं आहे.
आजही पाऊस होण्याची शक्यता
दरम्यान, आजही मराठवाड्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.