दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय ? : महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे ‘माथेरान’

टीम AM : मुंबई जवळ कर्जतमध्ये असलेले हे छोटेसे हिल स्टेशन पर्यटकांसाठी अतिशय आवडीचे ठिकाण आहे. येथील सौंदर्य आणि हिरवळ पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. माथेरान हे अतिशय शांत आणि अप्रतिम व्ह्यू पॉइंट असलेले एक विलोभनिय पर्यटन स्थळ आहे. येथे विश्रांतीसाठी आणि निसर्गासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या ठिकाणी पर्यटकांना भटकंती करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. माथेरानचे सौंदर्य प्रत्येक ऋतुत पर्यटकांना भुरळ घालते. या ठिकाणी कसे जावे, कोणते मार्ग आहेत आणि तेथे काय पाहावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

या वीकेंडमध्ये तुम्ही माथेरानला भेट देऊ शकता. मुंबई ते माथेरान हे अंतर फक्त 110 किलोमीटर आहे. या ठिकाणी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. तुम्ही इथे ट्रेकिंगही करू शकता. माथेरान हे राज्यातील पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या रांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंचीवर आहे. पर्यटक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी भेट देतात. माथेरानमधील दऱ्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेला डोंगराळ भाग पर्यटकांना येथे खेचून घेऊन येतो. या ठिकाणी भेट दिल्यास तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळू शकते.

माथेरानला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ मुंबई आणि पुणे आहे. याचे अंतर माथेरानपासून सुमारे 85 आणि 130 किलोमीटर आहे. तुम्ही विमानाने माथेरानला जात असाल तर तुम्ही या दोन विमानतळांवर उतरू शकता. इथून पुढे तुम्हाला टॅक्सी किंवा बसने प्रवास करावा लागेल. माथेरानचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ जंक्शन आहे. हे स्टेशन माथेरानपासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही रेल्वेने येथे जाणार असाल तर याच स्टेशनवर उतरा. याशिवाय देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून बसने माथेरानच्या सहलीला जाता येते.

माथेरान हे डोंगरांनी वेढलेले ठिकाण आहे. येथे पर्यटकांना हिरवीगार जंगले पाहायला मिळतात. येथील जंगलात बिबट्या, हरिण, कोल्हा आणि लंगूर हे प्राणी आढळतात. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि दृष्ये पर्यटकांच्या मनाला आनंद देणारी आहेत. माथेरानमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी फिरू शकता. पर्यटक प्रबलगढ किल्ला, मंकी पॉइंट, लुईसा पॉइंट, अंबरनाथ मंदिर आणि चार्लोट तलावाला भेट देऊ शकतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून क्षणभर विश्रांती घेण्यासाठी तुम्ही माथेरानला नक्की भेट देऊ शकता. येथे तुम्हाला थंड आणि शांत निसर्गाचा अनुभव मिळेल.