मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा

टीम AM : राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.

या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवलं आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा धास्तावला आहे. सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान तर होतच आहे. शिवाय शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येणारा मान्सून हा कमकुवत असेल, अशी भीती देखील वाटू लागली आहे.

अशातच, आता भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने हा जर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवला आहे.

कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सदर हवामान अंदाजानुसार 24 एप्रिल रोजी अर्थातच येत्या सोमवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कायम राहणार आहे.

याशिवाय 25 एप्रिल रोजी देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे. यामध्ये हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी व नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असं कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने नमूद केले आहे. विशेष बाब अशी की, हे दोन दिवस पडणारा पाऊस वादळी वाऱ्यासह पडेल, असं यावेळी नमूद करण्यात आलं आहे.

यामुळे निश्चितच मराठवाड्यातील वर नमूद केलेल्या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला अधिक सजग आणि सतर्क रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही भागात सध्या अवकाळी पाऊस पडतच आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात यामुळे आणखीनच भर पडणार आहे.