अवकाळी अन् गारपीट : तिघांचा मृत्यू, 33 जनावरांचा अंत

टीम AM : हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरवत मराठवाड्यात गेल्या 24 तासांत पावसाने जबर धिंगाणा घातला. इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस बघायला मिळत आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बर्फवृष्टीने शिवारच झाकून टाकले !

या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवरही पाणी ओतले. पुढील 72 तास अवकाळी मराठवाड्यात मुक्काम ठोकून राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री विजा पडून मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 33 जनावरांचा अंत झाला आहे. 

शुक्रवारी रात्री मराठवाड्याच्या अस्मानात अचानक पावसाळी ढगांनी दाटी केली. बघता बघता तासभर पावसाने धुमशान केले. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात बीडसह वडवणी, केज, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. 

केज तालुक्यात निसर्गाचे रौद्रभीषण रूप पाहून काळजाचा थरकाप उडाला. बर्फवृष्टीने शेतेच्या शेते झाकून टाकली. शिवारात गारांचा वीतभर खच साचला. हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे कांदा, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेली हळदही भिजली. नांदेड जिल्ह्यात देगलूर, मुक्रमाबाद परिसरात पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात झरी, सेलू, गंगाखेड, मानवत, जिंतूर, पालम, सोनपेठ, पूर्णा आदी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातही पाऊस झाला.