टीम AM : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5, 335 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 25, 587 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
काल बुधवारी देशात 4, 435 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 11 जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची ही रुग्णवाढ 6 महिन्यांतील सर्वांधिक आहे. आठवड्याच्या आत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. बुधवारी कोरोनाने महाराष्ट्रातील 4 जणांचा बळी घेतला. तर दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पाँडेचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या 24 सप्टेंबरनंतरची ही सर्वांधिक दैनंदिन रुग्णसंख्या वाढ आहे.
सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले नसले तरीही कोविड – 19 रुग्णसंख्येत होणारी सततची वाढ ही चिंतेची बाब आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतरराज्यीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.