हजारो रामभक्त युवकांचा सहभाग : श्रीरामाच्या भव्य मुर्तीचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
अंबाजोगाई : रामजन्मोत्सव निमित्त्याने शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणूकीत हजारो रामभक्त युवकांचा सहभाग होता. या निमित्ताने शहरात भगवे ध्वज, पताका, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील पुरातन राम मंदीरात जन्मोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
रामभक्तांच्या वतीने शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. पाटील चौक भागातील राममंदीर येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन शहरातील विविध महत्वपुर्ण चौक, मुख्य रस्ते आदी ठिकाणाहून या मिरवणूकीने मार्गक्रमण केले. यावेळी भव्य अशा श्रीरामांच्या आकर्षक मुर्तीचे भक्तांनी दर्शन घेतले. या मिरवणूकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मिरवणूकीने शहरातील वातावरण भक्तीमय
रामजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राम मंदिरात जन्मोत्सव तसेच पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या निमित्त्याने शहराच्या धार्मिक वैभवात भर पडली, तसेच वातावरण भक्तीमय झाले. विशेष म्हणजे शहरातून निघालेली भव्य मिरवणूक शहराचे प्रमुख आकर्षण होती, प्रभु रामचंद्रांच्या मुर्तीचे विधिवत पुजन करून या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला होता.
भगवे ध्वज घेतलेले युवक ठरले आकर्षण
कोरोना संकटामुळे युवकांना सर्व सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. संकट नाहिसे झाल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असता यात हजारो युवक भगवे ध्वज घेवून मिरवणूकीत समुहाने सामील झाले होते. विविध रामगीतांच्या गाण्यावर अभिनय आणि नृत्य करून आपल्या हातातील ध्वज हवेत उंचवून नागरिकांचे लक्ष वेधत होते. मिरवणूकी दरम्यान ठिकठिकाणच्या रस्त्यावर रांगोळ्या काढून भगव्या पताका, ध्वज, फलक, लावुन मिरवणूकीचे शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.