एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 5150 इलेक्ट्रिक बस : गारेगार प्रवास अनुभवता येणार

मुंबई : खासगी वातानुकूलित बसेसच्या स्पर्धत एसटीची इलेक्ट्रिक वातानुकूलित सेवा येत्या काळात सज्ज होणार आहे. या आर्थिक वर्षात 150 इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट उलेक्ट्रो आणि विनसेल या कंपन्यांना दिले असून, येत्या काळात पुन्हा नव्याने 5150 इलेक्ट्रिक बसेससाठी एसटीने निविदा काढली आहे. 

12 एप्रिल पर्यंत निविदेचा अंतिम निर्णय होणार असून, राज्यभरातील एसटी प्रवाशांना निमआराम असलेल्या हिरकणी बसेसच्या भाडे दरात इलेक्ट्रिक बसचा गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या एकूण सुमारे 13 हजार बसेस आहेत तर सुमारे 3 हजार पेक्षा अधिक बसेस नादूरूस्त आणि कालबाह्य झाल्या आहेत. परिणामी सध्या रस्त्यावर प्रवासी जास्त आणि बसेस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामूळे नविन बसेस चलणात आणण्यासाठी एसटी महामंडळाचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सध्या एसटीच्या मध्यवर्ती साध्या आणि निमआराम हिरकणी बसेसची उभारणी सुरू आहे. त्यातच आता 9 मिटर आणि 12 मिटर इलेक्ट्रिक बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या बसेसवर कंत्राटदारांचेच चालक राहणार असून, एसटी महामंडळ प्रती किलोमीटर 48 रूपये प्रमाणे कंत्राटदाराला पैसे अदा करणार आहे.

सुमारे 325 किलोमीटर धावतील अशा इलेक्ट्रिक बसेस राहणार असून, त्यासाठी राज्यभरात 170 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या बसेस संपुर्णतहा वातानुकूलित राहणार असून, 9 मिटर इलेक्ट्रिक मिडी बसमध्ये 32 आसने राहणार आहेत तर 12 मिटर इलेक्ट्रिक बसमध्ये चालक, वाहकांना धरून एकूण 45 आसने राहणार आहेत. या बसेसची अंतिम निविदा वितरीत झाल्यानंतर संबंधीत कंपनीला 1 कोटी रूपये डिपाॅजीट आणि 9 कोटींची बँक गँरेंटी भरावी लागणार आहे.

अशा असतील सुविधा

इलेक्ट्रिक बस पुर्णतहा वातानुकूलित असेल, पुशबॅक आसने, चार्जिक साॅकेट, वाॅटर बाॅटल साॅकेट, पेपर ठेवण्याची सुविधा, मुव्हेबल फुटरेस्ट राहणार असल्याने प्रवाशांचा आरामदायक प्रवास होणार आहे.