मनस्विनीचा पुढाकार : महिला, मुलींसह राजकीय कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग
अंबाजोगाई : पुस येथे अलिकडेच सहावर्षीय बालिकेवर साठ वर्षाच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराचे आज अंबाजोगाई शहरात पडसाद उमटले. मनस्विनी महिला संघटनेने या अत्याचार प्रकरणी पुढाकार घेत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात शहरातील विविध शाळां, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांसह राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, महिलांच्या सन्मानासाठीचा जागतिक महिला दिन काही दिवसांवर असतांनाच माणुसकीला शरम वाटावी अशी घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे, शहरातील वेणूताई चव्हाण प्राथमिक विद्यालयात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर पूस येथे लैंगिक अत्याचार झाला आहे. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर बलात्कार करण्याची वृत्ती जोपासणाऱ्या या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने सजग भूमिका घ्यावी.
स्त्रियांना उपभोगाची वस्तू मानणाऱ्या नासक्या पुरुषी मानसिकतेचा धिक्कार करण्यासाठी आणि जलद न्यायालयात सदर प्रकरण ठेऊन अन्यायग्रस्त मुलीला न्याय मिळावा, या हेतूने आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थिनी आणि नागरिक हे निवेदन देत आहोत. गेल्या काही वर्षांपासून अंबाजोगाई आणि जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. मागील वर्षी अशाच प्रकारची घटना अंबाजोगाई शहरात घडली होती. त्यावेळी मनस्विनी महिला प्रकल्पाच्या तत्परतेमुळे ते प्रकरण समोर आले.
पुरोगामी आणि शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेल्या अंबाजोगाई शहरात आजूबाजूच्या खेड्यातून अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी येथे येतात. आर्थिक, सामाजिक अडचणीवर मात करत स्वतः ला माणूस म्हणून जगता यावे, यासाठी धडपडत असतात. त्यांच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा उठवण्याची पुरुषी मानसिकता बळावत चाललेली आहे. मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे ही प्रशासनाची जवाबदारी आहे. या निवेदनाद्वारे आम्ही लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर तात्काळ कायदेशीर कठोर कारवाई करावी, याची मागणी करतो.
यावेळी मोर्चातील विद्यार्थिनींनी काही मागण्या केल्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत.
1. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांचा किंवा संबंधित प्राधिकरणाचा टोल – फ्री क्रमांक लिहिलेला फलक दर्शनी भागात लावला गेला पाहिजे. जेणे करून विद्यार्थिनींना तात्काळ मदत मिळेल.
2. सर्व ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या शाळा, किंवा सार्वजनिक ठिकाणी असे फलक तात्काळ लावावेत.
3. प्रत्येक प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेत लैंगिक छळ व लैंगिक शोषण सूचक वर्तन विषयाचे जागृती वर्ग प्रत्येक वर्षी घेण्यात याव्येत.
4. पोलिसांचे दामिनी पथक किंवा दक्षता समितीने पालक व मुले – मुली यांना संबंधित विषयाची माहिती देणे अनिवार्य करा, अशा मागण्या करण्यात आल्या.