टीम AM : रंगपंचमी हा सण आज 25 मार्च रोजी आहे. हा असा एकमेव सण आहे जेव्हा सगळे एकत्र येऊन याचा आनंद घेतात. सगळ्यांना हा रंगाचा सण आणि त्याचे सौंदर्य माहित आहे. रंगपंचमीला येणाऱ्या आनंदात बॉलिवूडचा देखील वाटा आहे. रंगपंचमीवर असलेली धमाल गाणी आपण नेहमी ऐकतोच. या सगळ्यात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन ते रणबीर कपूर आणि दिपीका पदुकोण या कलाकारांच्या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
होली के दिन दिल खिल जाते है..’शोले’ या चित्रपटातल्या या गाण्यामुळे उत्साह होळीचा येतो. धर्मेंद्र – हेमा मालिनी यांचा अभिनय आणि त्यांना अनुक्रमे किशोर कुमार आणि लताबाई यांनी दिलेला आवाज, राहुलदेव बर्मन यांचं संगीत, आनंद बक्षी यांचं गीत हे मिश्रण एकदम होळीच्या भांगेसारखं एकजीव झालंय.
ओ होली आयी होली आयी देखो होली आयी रे..अनिल कपूर, रति अग्निहोत्री यांची मुख्य भूमिका असलेला ‘मशाल’ हा चित्रपट 1984 ला प्रदर्शित झाला. यातलं किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं म्हणजे मराठी गाण्याच्या चालीचा हिंदीला चढवलेला साज आहे. पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी ‘जैत रे जैत’ चित्रपटातल्या ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीताची चाल या गीताला दिली आहे.
लय लय भारी… होळीचे गाणे किंवा रंगपंचमीचे गाणे म्हटल्यावर पहिल्यांदा तोंडात येतं ते हे गाणं. ‘लय भारी’ या गाजलेल्या चित्रपटातलं गाणंसुद्धा हिट झालं होतं. या गाण्यातील अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री राधिका आपटे आणि गेस्ट अपिअरन्समधील जेनेलियामुळे हे गाणं खूप गाजलं. आता दरवर्षी रंगपंचमीचे गाणं म्हणून हे आवर्जून लावले जाते. या गाण्याला संगीत दिलं आहे प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय – अतुल यांनी. तसंच हे गाणं गायलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि योगिता गोडबोले यांनी.
अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘डर’ सिनेमातील ‘अंग से अंग लगाना साजन हमे ऐसे रंग लगाना’ हे गाणं सर्वांना आठवत असेल. यश चोप्रा यांच्या सिनेमातील हे गाणं होळीच्या दिवशी आजही चाहत्यांना आठवते. 1993 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. हे गाणं अल्का याज्ञिक आणि विनोद राठोड, सुदेश भोसले यांनी गायलं आहे.
यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटातील हे गाणं आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि संजीव कपूर होते. या गाण्याचे बोल अमिताभ बच्चन यांचे वडील आणि दिग्गज कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते.
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, हेमा मालिनी परेश रावल, लिलेट दुबे यांच्या ‘बाघबान’ या चित्रपटातील होरी खेले रघुवीरा हे गाणं तर आजही प्रेक्षकांच्या तोंडी राहिलेलं आहे. हे आयकॉनिक गाणं दिवंगत आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्द केलं आहे. तर गाण्याचे बोल हे समीर यांनी लिहिले आहेत. या गाण्यात प्रभू रामचंद्र यांची कहाणी सांगितले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रवी चोप्रा यांनी केले आहे.
‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणं तर कोणीही विसरू शकत नाही. हे गाणं अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यावर कोरिओग्राफ करण्यात आलं आहे. या गाण्यानं आताच्या सगळ्या मुलांना वेड लावलं आहे. या गाण्याला संगीतबद्ध प्रितमनं केलं आहे. तर हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. विशाल ददलानी आणि शालमली खोलगडे यांनी गायली आहेत. ‘अंबाजोगाई मिरर’ च्या वतीने सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.