अंबाजोगाईत पारंपारिक पद्धतीने साजरी होणार शिवजयंती : विविध कार्यक्रमांचे आयोजन 

शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांची माहिती

अंबाजोगाई : शिवजन्मोत्सव – 2023 निमित्त शहरात दिनांक 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांनी दिली आहे. 

दि. 15 फेब्रुवारी रोजी झी – मराठी, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ विजेते, ‘मी होणार सुपरस्टार’ ‘आवाज महाराष्ट्राचा’ महाविजेते शाहीर गंधर्व पुथ्वीराज माळी, सांगली यांच्या शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम सायं. 6 वाजता वंजारी वस्तीगृह, तसेच दि. 16 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शहरातील सर्व शाळेत एकाचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित माहिती विषयक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रथम येणाऱ्यास  सायकल, द्वितीय पारितोषिक स्मार्ट वॉच व तृतीय पारितोषिक स्कूल बॅग देण्यात येणार आहे. दि. 17 फेब्रुवारीला भव्य आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10 वाजता वेणूताई महिला महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. 

शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे

दि. 18 फेब्रुवारी  रोजी भव्य रक्तदान शिबिर सकाळी 9 वाजता गजराई कॉम्प्लेक्स (रिगल) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे, तसेच महाशिवरात्री निमित्त अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या दिवशीही अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी 9 वाजता झेंडावंदन, सकाळी 9.15 वाजता जिजाऊ वंदना घेण्यात येणार आहे. 9.30 वाजता शिवशाहीर मामा काळे व शहरातील स्थानिक कलावंतांचा शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी 9.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित स्पर्धेचे बक्षिस वितरण होईल, सकाळी ठीक 11 वाजता साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक येथून भव्य मोटारसायकल रॅलीस सुरूवात होईल. 

सायंकाळी 4.45 वाजता शहरातून ऐतिहासिक भव्य – दिव्य मिरवणूकीची सुरुवात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौकातून होणार आहे, या मिरवणूकीत सर्व पारंपारिक देखावे असणार आहेत. मागील पंधरा वर्षांपासून अंबाजोगाई शहरात शिवजयंती उत्सव साजरा होत असतो. यात विविध सामजिक, शैक्षणिक, लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी कोरोना योद्धांचा सन्मान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम घेतले होते. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांनी दिली आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.